वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे शेतकरीवर्गाची एकच धांदल उडाली. किरकोळ स्वरूपातील वादळ व पावसानेच वीज कंपनीचे पितळ उघडे पडले. पाच तास शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
वैजापूर शहरानजीक रोटेगावपासून ते जानेफळपर्यंत पावसाच्या सरी कोसळल्या. खंडाळा, लोणी, सवंदगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने शेतकरीवर्गाचे हाल झाले. काढणीस आलेला कांदा, गहू, हरभरा व मका पिकांचे पावसाने नुकसान होणार आहे. काढून ठेवलेले मका, कांदा व गहू पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. पावसाचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर खर्च करून ताडपत्री खरेदी करावी लागली.
गहू काढणाऱ्या हार्वे स्टरचालक व मालकांनी आपले दर वाढवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली. रात्री उशिरापर्यंत शहरातील वीजपुरवठा खंडित होता. उच्च वाहिनीच्या वीज कंपनीच्य वैजापूर फिडर जवळील तारांवर झाड कोसळल्याने वीज पुरवठ खंडित झाल्याचे अधिकाऱ्यांन सांगितले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.












